Article

लघुउद्योग 'लघु' च का राहतात ? [भाग 2]

1 min read • Oct 14, 2026

लघुउद्योग 'लघु' च का राहतात ? [भाग 2]
- मिनिष उमराणी (औद्योगिक सल्लागार)

"प्राधान्य कशाला द्यायचे?"

एकदा का पुरेसे पैसे मिळू लागले की, बरेचदा लघु उद्योजकाचे लक्ष व्यवसायापेक्षा इतर गोष्टींकडे देखील जाऊ लागते. जसे की एखाद क्लबचा मेंबर होणे. तिथे सेक्रेटरी अथवा अध्यक्ष पद स्वीकारणे. कुठल्यातरी सामाजिक गोष्टींमध्ये सहभागी होऊन, संस्थेचे सेक्रेटरी- अध्यक्षपद स्वीकारणे. इत्यादी. या गोष्टी जरूर कराव्यात परंतु प्राधान्य कशाला द्यायचे हे ठरवावे लागते. किंवा बरेचदा असे उद्योजक वैयक्तिक कामांना अधिक प्राधान्य देऊन, अकरा-बारानंतर निवांत आपल्या कारखान्यामध्ये येतात. अशा लोकांच्या व्यवसायामध्ये अडचणी नसतात असे नाही, परंतु व्यवसाय म्हटलं की अडचणी असणारच, असे त्यांनी मान्य केलेले असते. आणि प्राधान्य मात्र व्यवसाया व्यतिरिक्त गोष्टींना दिले जाते.

पॉलीहायड्रोन ग्रुप” चे संस्थापक श्री. एस.बी. हुंदरे, यांना आम्ही पूर्वी भेटलो होतो. तेव्हाचा त्यांच्याशी झालेला संवाद माझ्या आजही आठवणीत आहे. ते म्हणाले होते, "कुटुंब की व्यवसाय, कशाकडे अधिक लक्ष द्यायचे ? असा प्रश्न मला

देखील सुरुवातीला पडला होता. बहुतेक उद्योजकांना हा प्रश्न पडतो. जसे एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला, कुटुंब की समाजसेवा ? हा प्रश्न पडतो. मी ठरवले की, व्यवसायाला प्राधान्य द्यायचे. कारण व्यवसायावरच तर कुटुंब अवलंबून असणार होते. मी व्यवसायाला प्राधान्य दिले, तो वाढला. मी कुटुंबाला प्राधान्य दिले असते, तर कुटुंब वाढले असते, नाही का?"

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातील, कितीतरी नेते आपण असे पाहिले आहेत की, त्यांनी कुटुंब हे कायमच दुय्यम मानले, व स्वातंत्र्य मिळवण्याला अधिक प्राधान्य दिले. म्हणून तर स्वातंत्र्य मिळाले, नाही का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते देखील कुटुंब दुय्यम मानून, राष्ट्र प्रथम मानतात. म्हणूनच ते राष्ट्र कार्य करू शकतात. तसेच अध्यात्म किंवा भक्ती या गोष्टीला अधिक प्राधान्य दिलेले रामदास स्वामी, संत तुकाराम असे संत महात्मे याच मातीत होऊन गेले.

कोणी कशाला प्राधान्य द्यायचे हा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न आहे. पण जेव्हा लघुउद्योग लघु का राहतो ? या विषयावर आपण चर्चा करत आहोत, तेव्हा त्यातील एक कारण मी सांगितले. व्यवसायाला प्राधान्य द्यायचे याचा अर्थ कुटुंबाकडे दुर्लक्ष करायचे असा नक्कीच नव्हे. कारण व्यवसाय देखील आपण आपल्या कुटुंबासाठीच तर करतो.

परंतु व्यवसाय म्हणजे नोकरी नव्हे. जी फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी केली जाते. उद्योजकावर जशी स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी असते, तशीच त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची देखील जबाबदारी ओघाने त्याच्यावरच येते. त्यांना वेळेत पगार मिळाला तर ते उद्योगाच्या नोकरीत राहतील, आणि तरच उद्योग चालेल.

विशेषतः अति लघु व लघु उद्योगांनी, वार्षिक टर्नओव्हर किमान दहा कोटी चे उद्दिष्ट, लवकरात लवकर गाठायला हवे. याला आपण उद्योगाची गुरुत्व मर्यादा म्हणू. जसे एखाद्या रॉकेटला, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणा बाहेर पडण्यासाठी, अधिक ताकद लावावी लागते, तसेच लघु उद्योगांना देखील दहा कोटीची मर्यादा पार करण्यासाठी अधिक ताकद लावणे गरजेचे असते. तसेच अधिक फोकस्ड असणे देखील आवश्यक असते.

उद्योजकाला जर, आपला उद्योग अधिकाधिक समृद्ध करायचा असेल, उद्योगाच्या गुरुत्व मर्यादेच्या बाहेर आपला उद्योग न्यायचा असेल, तर नक्कीच त्याचे प्रथम प्रधान्य हे, त्याचा 'उद्योग' असायला हवे, नाही का ?

.... भाग 2 समाप्त |


(गेल्या वीस वर्षाच्या माझ्या सल्लागारीच्या कारकिर्दीमध्ये मी किमान 200 तरी उद्योगांच्या संपर्कात आलो. त्यांच्या उद्योग वृद्धीमध्ये प्रत्यक्ष सामील होताना, मी घेतलेले अनुभव मी या, व यापुढील लेखात मांडतो आहे. यामागे कोणालाही अनाहूत सल्ला, किंवा व्यावसायिक दृष्टिकोन देखील नाही. किंबहुना लघु उद्योजकांशी चाललेले हे एक विचार मंथन आहे. यावर तुमची मतमतांतरे अपेक्षितच आहेत. हे विचारमंथन लघुउद्योजकांमधील त्रुटी दाखवणे, या उद्देशाने नाही. तर व्यवसाय वृद्धी कशी साधावी, हा आहे. आणि त्या उद्दिष्टापर्यंत या लेखमालेतून आपण नक्कीच पोहोचायचा प्रयत्न करूया.)

Found this useful? Talk to us about your own factory plan.

Get In Touch