Article

॥ औद्योगिक अंधश्रद्धा ॥ ( भाग 0 )

1 min read • Oct 14, 2026

॥ औद्योगिक अंधश्रद्धा ॥ ( भाग 0 )
- मिनिष उमराणी (औद्योगिक सल्लागार)
भ्रमणध्वनी : 9822390363 | minish@leansigmasolutions.in

] प्रास्ताविक [

अंधपणाने ठेवलेली श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा ! वर्षानुवर्षं, परंपरेने चालत आलेल्या असंख्य गोष्टी, कोणीतरी, केव्हातरी, कुठल्यातरी कारणाने सुरू केलेल्या असतात. परंतु त्याच्यावर विश्वास ठेवून, त्याच्यामध्ये कुठलाही बदल न करता, त्या तशाच चालू ठेवल्या जातात. किंबहुना त्या तशाच का आहेत, याचे स्पष्ट कारण देणेदेखील कोणाला ठाऊक नसते. उदाहरणार्थ, 'मांजर आडवे गेले की काम होत नाही'. उद्योगांमध्ये देखील माणसेच काम करत असतात. त्यामुळे काही टिपिकल अंधश्रद्धा विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये देखील पाहायला मिळतात. विशेषतः मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये अशा काही अंधश्रद्धा मी वर्षानुवर्ष पाहतो आहे.

उद्योगांमध्ये पाहायला मिळणाऱ्या अंधश्रद्धा, या सामाजिक अंधश्रद्धांसारख्या नसतात. तर उद्योगांमध्ये चालणाऱ्या विविध प्रकारच्या कामाच्या पद्धतींच्या बाबतच्या, समजूती

असतात. अशा प्रकारच्या समजुतींना देखील बरेचदा कोणतेही लॉजिकल कारण नसते. कित्येक वेळा यासाठी, कोणतीतरी इल्लॉजिकल कारणे देखील दिली जातात. ती सहसा पटण्यासारखी नसतात. किंबहुना त्या काही वेळा नुकसान कारकच असतात. परंतु अशा समजुतींवर श्रद्धा एवढी घट्ट असते की, सहसा त्या मोडायला लोक तयार होत नाहीत.

"गतानी गतिको लोकः, न लोकः पारमार्थिकः" असा एक संस्कृत श्लोक आहे. किंबहुना या प्रकारच्या भावनेमुळेच, लोक सहसा अशा समजुतीं प्रमाणेच काम करत राहतात. त्या बदलण्याची त्यांची मानसिकता नसते. किंवा धाडस होत नाही. कदाचित, दिसणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टीच्या मूळ कारणापर्यंत पोहोचण्याची तयारी नसते.

खूपदा, अशा समोर दिसणाऱ्या गोष्टीं वर केला जाणारा इलाज काही वेगळाच असतो. आणी त्या काही वेगळेच सिग्नल देत असतात. तो सिग्नल समजला, तर आपण त्याच्या मूळ कारणापर्यंत पोचून, त्याचे निराकरण करू शकतो. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले, तर कारखान्यात कामगार रिकामा दिसला, की अगदी मांजर दिसल्याप्रमाणे सुपरवायझर त्याच्यामागे शुक शुक करून लागतोच. त्याला काही ना काही कामांमध्ये गुंतवण्यासाठी सुपरवायझर धावपळ करतो. करण तो, तसा, मालकाला दिसू नये,

एवढीच काळजी त्याला असते. परंतु कामगार रिकामा दिसणे, हा खरे तर एक सिग्नल आहे, हे आपल्या सहसा लक्षात येत नाही.

जोपर्यंत या अंधश्रद्धांचा परिणाम, तुमच्या प्रोडक्टिव्हिटी वर होत नाही, तोपर्यंत त्याचा त्रास मानून घेण्याची फारशी गरज भासत नाही. मला माझ्या औद्योगिक सल्लागारितेच्या, गेल्या वीस वर्षाच्या प्रवासात, काही विशिष्ट अंधश्रद्धा, समजुती, पाहायला, अनुभवायला, मिळाल्या. कित्येक उद्योगांमध्ये अशा प्रकारच्या समजुतींच्या परिणामाने फार मोठे आर्थिक नुकसान होत असते, परंतु ते ध्यानातच येत नाही. यातील काही समजुतींमुळे, ओव्हर प्रोडक्शन, इन्व्हेंटरी, वेटिंग, अशा प्रकारचे MUDAs कारखान्यांमध्ये जनरेट होतात. कारखान्या मधील अशा प्रकारचे मुडाज् हे डायरेक्ट तुमच्या प्रॉफिटॅबिलिटी वर परिणाम करत असतात. MUDAs विषयी आपण त्याविषयीच्या लेखात जरूर समजून घेऊ. परंतु थोडक्यात सांगायचे म्हणजे, 'मुडा' (जापनीज शब्द), या कारखान्यातील अशा प्रकारच्या ऑपरेशन स्टेप्स, किंवा सवयी आहेत की, ज्यामुळे उत्पादन क्षमतेवर डायरेक्ट परिणाम होत असतो. लीन प्रणाली मध्ये या आठ प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. त्यातील वरील तीन मुडा अतिशय घातक. ज्या इतर मुडाज् क्रिएट करत असतात. असो.


उदाहरणादाखल काही समजुती अशा,
कामगार रिकामा असता कामा नये
मशीन सदैव बीझी असायला हवे
WIP म्हणजे वर्क इन प्रोग्रेस
इतर पार्ट्स येईपर्यंत असेंबली सुरू करा, इत्यादी.

या लले मध्ये दिलेली उदाहरणे, ही माझ्या कामात विविध ठिकाणी मला आलेले अनुभव आहेत. फक्त नावे टाळून ती दिली आहेत.

या लघुलेखमालेचा उद्देश, अशा प्रकारच्या अंधश्रद्धा समजून घेणे असा आहे.आपण अशा वेगवेगळ्या समजुती आणि त्यांचे परिणाम, या लेखमालेतील वेगवेगळ्या लेखांमधून समजून घेऊयात. पहा तुम्हाला उपयोग होतो का ?

.... भाग 0 समाप्त | 24
( तुम्हाला हे लघुलेख जर आवडत असतील, तर जरूर लाईक, कॉमेंट आणि शेअर करा 😊🙏)

Found this useful? Talk to us about your own factory plan.

Get In Touch