Article

॥ औद्योगिक अंधश्रद्धा ॥ ( भाग 1 )

1 min read • Oct 14, 2026

॥ औद्योगिक अंधश्रद्धा ॥ ( भाग 1 )
- मिनिष उमराणी (औद्योगिक सल्लागार)
भ्रमणध्वनी : 9822390363 | minish@leansigmasolutions.in

] रिकामा कामगार [

कामगार रिकामा असणे, म्हणजे उत्पादन थांबणे. आणि उत्पादन थांबणे, म्हणजे तोटा. कारखान्यांमध्ये ही समजूत वर्षानुवर्षं पाहायला मिळते. कंपनीत आलेल्या मालकाला, कामगार रिकामा दिसू नये, म्हणून प्लांटहेड नावाच्या माणसाची, कोण ती धावपळ असते. कामगार रिकामा आहे याचा अर्थ तो कामचुकार आहे, आणि कामाच्या वेळात इतर वैयक्तिक गोष्टी करत आहे, असाच अर्थ गृहीत धरला जातो. (अर्थात बहुतेकदा तसे असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही) कामगार रिकामा आहे, याचा अर्थ तो नेमून दिलेले काम करत नाही आहे. मग अशावेळी तो मोबाईलवर बोलत असेल, व्हाट्सअप चाळत असेल, किंवा फेसबुक वरची रिळं बघत असेल.

काम असून कामगार रिकामा असणे, आणि काम नाही म्हणून कामगार रिकामा असणे, या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. "रिकामा कामगार" हा खरे तर तुमच्या उत्पादन

प्रक्रियेला, प्रशासकीय व्यवस्थेला मिळालेला एक सिग्नल आहे.

आपलं डोकं दुखत असेल, तर आपण डोके दुखण्यासाठी गोळी घेतो. परंतु खरे तर तो आपल्या मेंदूने दिलेला एक सिग्नल असतो. मेंदूवर नक्की कशाचा ताण आला आहे तो समजून घेऊन, तो कमी करायला हवा. त्यापेक्षा आपण एखादी गोळी घेऊन, तात्पुरता इलाज करून, डोके दुखणे थांबवतो. तसेच काहीसे 'रिकामा कामगार' या सिग्नल बाबत होते. हा कशाचा 'सिग्नल' आहे हे जाणून घेण्याऐवजी, त्याला काही ना काही कामांमध्ये गुंतवून, "कामात दिसा" हा संदेश पाळला जातो.

काम असूनही कामगार रिकामा असणे, किंवा त्याने वेळ वाया दवडणे, हे तुमच्या उत्पादन प्रक्रियेवर योग्य कंट्रोल नसण्याचे द्योतक आहे. कामाची योग्य मोजदाद होत नसेल, कामगाराच्या अथवा कर्मचाऱ्याच्या परफॉर्मन्सचे मापन होत नसेल, तर अशा गोष्टी नक्कीच दिसतात. एका मसाले तयार करण्याच्या कारखान्यामध्ये, मला तिथल्या सुपरवायझरने सांगितले की, त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिला कामगार, काम करताना अति गप्पा मारतात. आणि त्यामुळे रोजचे उत्पादन हवे तेवढे मिळत नाही. आता अशावेळी 'शांतता राखा' सारखा बोर्ड लावणे, म्हणजे डोके दुखीवरची गोळी घेण्यासारखेच होते.


आम्ही त्यांच्या एकेक प्रॉडक्टचा प्रत्यक्ष पॅकिंगचा सायकल टाईम चेक केला, आणि पर अवर पॅकिंग रेट (numbers÷hour) मोजला. त्या रेट ला जेव्हा आम्ही शिफ्ट अवर्सने गुणले, तेव्हा आलेली संख्या, ही नेहमीच्या रोजच्या पॅकिंग पेक्षा खूपच जास्त होती. परंतु नक्की मोजदाद न केल्याने, ते कधी लक्षात आले नव्हते. मग आम्ही त्यांच्या पॅकिंग स्टेशनवर पॅकेट वाईज, पॅकिंगचे पर अवर रेट, कागदावर लिहून चिकटवले. आणि कामगारांना देखील तसे समजावले. त्यांनाही त्यांची चूक लक्षात आली. मोजलेल्या रेटच्या पाच दहा टक्क्याच्या फरकाने रोजचे पॅकिंग वाढले, आणि गप्पा मारणे देखील हळूहळू कमी होत गेले.

कामगाराला रोजचे पुरेसे काम नसणे, हा तर सरळ साधा सिग्नल आहे, तुमच्याकडे ऑर्डर्स कमी असण्याचा. अशावेळी कामगार काम निवांतपणे करतात, कामावर वेळेवर येत नाहीत, जेवणाच्या वेळेची सुट्टी वाढवतात, अशा प्रकारच्या तक्रारी करण्यामध्ये काही अर्थ नसतो. तुमच्याकडे पुरेशा ऑर्डर असणे, आणि त्या सतत वाढत असणे, हे, तुमच्या उत्पादन प्रक्रियेवर आणि अर्थात कामगार च्या क्रयशक्तीवर आपोआपच सकारात्मक प्रेशर निर्माण करतात. आणि मग तुम्हाला कामगार रिकामा

दिसण्याची शक्यता मुळातूनच कमी होते. हा सिग्नल न लक्षात आल्यामुळे, किंवा त्याकडे दुर्लक्ष करून, लोक, "आमच्याकडे HR इशू आहे" असे सांगत राहतात. काम कमी असल्यामुळे, जर कामगार रिकामा राहत असेल, तर प्रथम कामगाराच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. आणि मग वर सांगितलेले सो कॉल्ड HR इशू निर्माण होतात. एका मशीन टूल्स बनवणाऱ्या कारखानदाराने, जेव्हा अशा प्रकारचा HR इशू सांगितला, तेव्हा आम्ही प्रथम त्यांचा मंथली सेल आणि त्यांची मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी यांची तुलना केली. त्यांच्या कॅल्क्युलेटेड मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटीच्या निम्म्या देखील ऑर्डर्स त्यांच्या हातात नव्हत्या. अशावेळी साहजिकच आहे, काम थंडपणाने चालणार.

याउलट एक वेगळीच केस मला अनुभवायला मिळाली. जिथे कामगारांना 'रिकामे बसवून ठेवणे' ही गोष्ट आम्हाला सिग्नल म्हणून वापरावी लागली. ग्लास फायबरचे प्रॉडक्ट असेंबल करणाऱ्या एका कारखान्यांमध्ये, इनकंप्लीट बिल ऑफ मटेरियल दिल्यामुळे प्रोडक्ट्सचा मॅन्युफॅक्चरिंग लीड टाईम वाढत होता. WIP वाढत होती. अशावेळी आम्ही एक नियम केला. 100% बिल ऑफ मटेरियल दिले नाही तर, असेंबली लाईन बंद ठेवायची, आणि कामगार बसवून ठेवायचे. इनकंप्लीट बिल ऑफ मटेरियल घेऊन अर्धे मुर्धे काम करण्यामध्ये, कामगार बिझी रहात. त्यामुळे परचेस डिपार्टमेंट वर सारे मटेरियल वेळेत आणण्याचे प्रेशर क्रिएट

होत नव्हते. ते प्रेशर, कामगारांच्या रिकामे बसण्यामुळे निर्माण झाले. आणि असेंबली लाईनला शंभर टक्के बिल ऑफ मटेरियल मिळू लागले.

तर सांगायचा मुद्दा हा, की कामगार कामाची टाळाटाळ करत असेल, कामावर वेळेत येत नसेल, कामाच्या वेळेत रिकामा दिसत असेल, तर त्याचे रूट-कॉज शोधायला हवे, नाही का? तो रिकामा दिसणे, हा एच आर प्रॉब्लेम समजणे, ही मात्र अंधश्रद्धा !

.... भाग 1 समाप्त |

(या ललें मध्ये दिलेली उदाहरणे, ही माझ्या कामात विविध ठिकाणी मला आलेले अनुभव आहेत. फक्त नावे टाळून ती दिली आहेत. तुम्हाला हे लघुलेख जर आवडत असतील, तर जरूर लाईक, कॉमेंट आणि शेअर करा 😊🙏)

Found this useful? Talk to us about your own factory plan.

Get In Touch