Article

लघुउद्योग 'लघु' च का राहतात ? [भाग 3]

1 min read • Oct 14, 2026

लघुउद्योग 'लघु' च का राहतात ? [भाग 3]
- मिनिष उमराणी (औद्योगिक सल्लागार) | ९८२२३९०३६३

| आमचे येथे |

"आमचे येथे,
पेन(ण)च्या सुबक गणपतीच्या मूर्ती मिळतील
अंडी मिळतील 3/- रुपये एक
ब्लाउज शिवून मिळतील
इयत्ता पहिली ते चौथी ट्युशन्स
देवगड हापूस 6○○ रुपये डझन"
अशा प्रकारचा बोर्ड तुम्ही एखाद्या दुकानावर किंवा घरावर पाहिला असेल. तसेच, "संगीता किराणा मार्ट" "संगीता ब्युटी पार्लर" "संगीता शिवण क्लास" असे देखील विविध व्यवसायाचे बोर्ड्स् एकाच दुकानावर किंवा घरावर लावलेले देखील पाहिले असतील. अशा प्रकारचे विविध व्यवसाय करून महिन्याचा घर खर्च चालवणे किंवा अधिक चांगली लाइफस्टाइल साधणे, हा एकमेव उद्देश येथे असतो. हे पक्के व्यावसायिक असतात. परसदाराच्या बागेतल्या झाडाला आलेल्या पपया देखील, हे घराच्या दारात स्टूलवर विकत ठेवू शकतात. परंतु यांना "एंटरप्रेन्युअर" असे नाही म्हणता येणार. जसे अशा प्रकारच्या व्यवसायाचे उद्दिष्ट अतिशय वैयक्तिक आणि छोटे, तसेच त्याचे उत्पन्न देखील. एखाद्या

लघु उद्योगा प्रमाणे उत्पन्न लाख-कोटींमध्ये जाण्याची, किंवा रोजगार निर्मिती होण्याची यात शक्यता नसते. आणि अशा व्यवसायांचा हा उद्देश देखील नसतो.

जेव्हा एखादा उद्योजक, एखादी वस्तू तयार करण्यासाठी आपला कारखाना एस्टॅब्लिश करतो, तेव्हा त्याचा सारा फोकस तोच उद्योग मोठा करण्यावर असेल, तर तो लवकर मोठा होण्याच्या शक्यता निर्माण होतात. परंतु जेव्हा त्या उद्योगातून पुरेसे उत्पन्न मिळत नाही असे होते, तेव्हा त्या व्यतिरिक्त काहीतरी चालू करण्याची किंवा जोडधंदा असण्याची आवश्यकता वाटण्याची शक्यता खूप असते. असे वाटू लागणे, ही खरे तर धोक्याची घंटा आहे. आणि हा संकेत नक्कीच ओळखला पाहिजे. हे म्हणजे पहिला मुलगा पुरेसा हुशार नाही, म्हणून दुसऱ्या मुलाला जन्म देण्यासारखे आहे. 😁

एस्पेशियली, कोविडच्या महामारी दरम्यान बऱ्याच अति-लघु आणि लघुउद्योगांना फटका बसला. विशेषतः अति लघु उद्योगांना तर हा काळ तरुन जाणे देखील खूप अवघड झाले होते. किंवा अचानक मंदी येते. एखाद्या उत्पादनाचे मार्केट अचानक खूप डाऊन होते. अशा प्रकारच्या अनाहूत आणी अवघड काळात, अशी गोष्ट होण्याची शक्यता खूप सारी असते. आणि तसे करणे देखील अगदीच अयोग्य असे नाही म्हणता येणार. कारण उद्योजक टिकला तर उद्योग टिकेल.


परंतु अशा परिस्थितीतून बाहेर आल्यावर, पुन्हा आपला फोकस मूळ उद्योगावर स्थिर करणे आवश्यक आहे. अन्यथा एका पेक्षा वेगवेगळे उद्योग करून महिन्याचे उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट, हे मूळ उद्योगाच्या वाढीसाठी घातक ठरते. ज्या परिस्थितीत असा जोडधंदा सुरू केला होता ती परिस्थिती जेव्हा संपते, तेव्हा नेमकेच जोडधंदा देखील चांगले उत्पन्न देऊ लागतो. अशावेळी काय करायचे हा प्रश्न पडतो. जोडधंद्याचे उत्पन्न इतके होत जाते की त्यामध्ये एखाद्याच्या मूळ गरजांसाठी लागणारे पूर्ण पैसे मिळून, चैनीसाठी देखील पैसे उरू लागतात. मूळ उद्योगाबरोबर दोन-तीन अधिक उत्पन्नाची साधने सांभाळण्यामुळे
साहजिकच मूळ जो उद्योग आहे त्याकडे फोकस कमी होऊ शकतो. परंतु हा मोह आहे, याचे भान राखायला हवे. किंबहुना मूळ उद्योगांमध्ये कधी पैसे कमी पडतील तेव्हा या जोडधंद्यामधून पैसा आणला जातो, व मूळ उद्योगातील वसुली मागे राहून जाते. आणि जोपर्यंत हे अति होत नाही तोपर्यंत, त्याचे प्रेशर जोडधंद्यातून येणाऱ्या पैशांमुळे जाणवत नाही. ही सर्वसाधारण व्यावसायिक मानसिकता आहे. अशावेळी असे व्यवसाय तातडीने स्वतःपासून वेगळे करणे, अथवा त्यामधून येणारे उत्पन्न मूळ उद्योगांमध्ये न आणणे बरे.

मागील भागात आपण 'उद्योग' हा प्राधान्य क्रमाने असायला हवा हे पाहिले. हा फोकस द्विधा होऊ नये, याची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. मूलतः कोणताही उद्योग हा वैयक्तिक उत्पन्नाचे साधन म्हणूनच सुरू होत असतो. त्यामुळेच प्रथम वैयक्तिक गरजा या अधिक महत्त्वाच्या. परंतु तो जसा वाढत जातो तसे त्याचे उद्दिष्ट अधिक मोठे होत जात असते. हे समजून घेणे आवश्यक आहे

MICRO to SMALL या प्रवासातलं अशा प्रकारचं हे वरीस धोक्याचं म्हणायला हरकत नाही. परंतु असे बहुदा मायक्रो उद्योगांच्या बाबतीत होण्याची शक्यता अधिक असते. लघुउद्योग, मध्यम उद्योग, सहसा अशा संकटात तरुन जातात. अशा संकटाला तोंड देण्याइतपत त्यांची परिस्थिती ठीक असते. अशा काळात यांचे उत्पन्न कमी होते. परंतु थोडीफार मॅनपावर कमी करून, खर्च कमी करून, लोकांच्या पगारात कपात करून, असे उद्योग हा काळ निभावून काढतात. परंतु हे, अशा काळात एखादा भलताच जोडधंदा सुरू करतील ही शक्यता जवळपास नसते. एकदा का कठीण काळ संपला की पुन्हा त्यांचा उद्योग आहे त्या स्थितीत चालू राहतो.

उद्योग करतो तो 'उद्योजक', इतपतच या शब्दाची व्याख्या करता येणार नाही. तर 'उद्योजकता' ही एक मानसिकता आहे. संकटांचे देखील संधीत रूपांतर करणारी ही अतिशय

सकारात्मक मानसिकता आहे. हे लोक छोट्या मोठ्या संकटांनी घाबरून जात नाहीत. उंचावरून मांजर जशी कशीही पडली, तरी ती चार पायावर उभी राहते, तसेच अशा संकटांवर मात करून हे उद्योग पुन्हा नेटाने उभे करतात.

अति-लघु उद्योजकांनी, या मानसिकतेचा नक्कीच विचार करायला हवा. वार्षिक एक-दोन कोटीच्या टर्नओव्हर वरून, किमान पाच कोटीची दहीहंडी फोडायची, तर जागेवर उड्या मारून, देवळातली घंटा वाजवण्या इतपत मर्यादित उद्दिष्ट ठेवून चालणार नाहीत. तसेच दहीहंडी वरचे लक्ष जसे केंद्रित करावे लागते तसेच मूळ उद्योगावर त्याच्या वाढीवर लक्ष केंद्रित व्हायला हवे. जो उद्योग वाढवायचा आहे त्यावर अधिक फोकस्ड असणे गरजेचे, नाही का?

.... भाग 3 समाप्त | ३० जून २४

Found this useful? Talk to us about your own factory plan.

Get In Touch