Article

लघुउद्योग 'लघु' च का राहतात ? [भाग 4]

1 min read • Oct 14, 2026

लघुउद्योग 'लघु' च का राहतात ? [भाग 4]
- मिनिष उमराणी (औद्योगिक सल्लागार)
भ्रमणध्वनी : 9822390363

| आर्थिक गैर-व्यवस्थापन |

मागे एकदा, सिल्वासा मधील एका एलईडी लाईट बनवणाऱ्या कंपनीची एन्क्वायरी आली होती. मी त्यांना भेटायला त्यांच्या कंपनीमध्ये गेलो. कंपनी बिल्डिंग खूप मोठी होती. परंतु खूप सारी अस्ताव्यस्त दिसत होती. रिसेप्शनिस्टने दाखवल्याप्रमाणे मी MD केबिनमध्ये जाऊन बसलो. साहेब लॅपटॉप वर काही काम करत होते. त्यांनी मला चहा-पाणी विचारून, दहा मिनिटे मागून घेतली. आणि ते त्यांच्या कामात मग्न झाले. मी माझ्या सवयीप्रमाणे, त्यांचे टेबल, त्यांचे केबिन, आणि त्यांचा चेहरा, निरीक्षण करू लागलो. टेबलवर इतर विविध गोष्टींबरोबर, मला एका ट्रेमध्ये लिहिलेल्या चेक्स चा एक मोठा गठ्ठा दिसला. किमान 50- 60 तरी चेक असावेत. मला दिसणाऱ्या सगळ्यात वरच्या चेकवर सही नव्हती. आणि तारीख वीस दिवसांपूर्वीची होती. चालू काम संपल्यानंतर ते माझ्याकडे वळले, "येस्स सर ! आपण बोलूयात आता."

सहसा अशावेळी मी प्रथम कंपनी प्रमुखाच्या अडचणी काय

आहेत, आणि मला का बोलावले आहे, ते विचारतो. आणि माझ्या नोटबुक मध्ये लिहून घेतो. परंतु मी त्यांचा चेहरा न्याहाळत, त्यांना म्हणालो, "सर राग येणार नसेल तर काही विचारू का?" तसे त्यांनी लगेच हसत हसत नक्कीच विचारा असे सांगितले. त्यावर मी त्यांना म्हणालो, "बहुदा तुम्ही मला इथे बोलावले आहे, त्याची कारणे मी सांगू शकतो. एक म्हणजे तुमच्या कारखान्यातील व्यवस्थापन बिघडले आहे, कर्मचाऱ्यांची गैरहजेरी, कामावर वेळेत न येणे, कपॅसिटी पेक्षा कमी प्रोडक्शन होणे, रिजेक्शन मोठ्या प्रमाणात असणे, इत्यादी." त्यांच्या कपाळावर थोड्या आठ्या पडल्या. भुवया उंचावून ते म्हणाले, "होय. साधारण अशाच प्रकारच्या अडचणी आम्हाला आहेत. पण यातले तर मी तुम्हाला काहीच सांगितले नाही." त्यावर मी त्यांना म्हणालो, "याव्यतिरिक्त देखील तुमच्या काही अडचणींचा अंदाज मी करू शकतो. तुम्ही सांगालच अर्थात. "तुम्ही फोनवर सांगितल्याप्रमाणे, तुमचा मागील वर्षीचा टर्नओव्हर 25 कोटी रुपयांचा आहे. म्हणजे मासिक साधारण दोन सव्वादोन कोटी. माझ्या अंदाजाप्रमाणे, आपल्याला बिल रिकव्हरी मध्ये प्रॉब्लेम असू शकतो. आणि साधारणपणे चार ते पाच महिन्याची, म्हणजेच, दहा कोटीच्या दरम्यान रिकवरी आऊटस्टँडिंग असावी. तसेच सर्वसाधारण तेवढीच किंवा आठ कोटीच्या दरम्यान तुमची इन्व्हेंटरी असावी. यातील किमान दीड ते दोन कोटी रुपयांची इन्व्हेंटरी ही नॉनमुव्हींग असावी. असं मला वाटतं." आता मी त्यांचा

चेहरा अधिक बारकाईने निरखू लागलो. त्यांनी शक्यतो चेहरा कोरा ठेवायचा प्रयत्न करत, आपली खुर्ची त्यांच्या लॅपटॉप कडे वळवली. घाईने त्यांनी TALLEY उघडले आणि काही आकडे पाहून, पुन्हा माझ्याकडे वळले. खुर्चीवरून उठून थेट उभे राहिले आणि आश्चर्याने विचारते झाले, "तुम्ही एवढे करेक्ट अंदाज कशावरून बांधलेत?"

अर्थात यात फारसं काही अवघड नव्हतं. टेबलवर पडलेला बिन सह्यांच्या चेकचा गठ्ठा एकूण उद्योगाबद्दल सारं काही बोलून जात होता. ज्या अर्थी हा मनुष्य चेकने पेमेंट करत होता, आणि तेही 20-20 दिवस सही न केलेले चेक ठेवत होता, त्याअर्थी त्याला कॅश फ्लो चा प्रॉब्लेम असण्याची शक्यता होती. ती असायचं कारण हे त्याचं बाजारात असलेलं आऊटस्टँडिंग पेमेंट असू शकतं. हे समजणं सहज शक्य आहे. महिन्याच्या दोन कोटीच्या सेलमधून 30% ग्रॉस मार्जिन पकडलं, तरी साधारण 60 लाख दर महिन्याला हातात उरायला हवेत. परंतु जर दोन कोटीच्या टर्नओव्हर मधील 70 80 टक्के पेमेंट उशिरा येत असेल, एखादे मोठे पेमेंट तीन-चार महिने अडकून पडले असेल, तर साहजिक आहे, कॅश फ्लो वर परिणाम होणार. आणि मग ओघानेच लोकांचे पगार देणे वेळेत होणार नाही. मधेआधे एखाद्या महिन्यात जरी, एखादा मोठा खर्च केला, जसे की गाडी घेतली, एखादे मोठे मशीन घेतले, तर सीसी आपोआपच

ब्लॉक होऊन जाते. आणि कामगारांचे पगार वेळेत होत नसतील, तर त्यांचे दांड्यांचे प्रमाण वाढणारच की. इतका सरळ साधा हिशोब होता तो. मी अंदाज बांधला आणि तो नेमका खरा ठरला इतकच. दगड मारला आणि आंबा पडला नेमका.

हा प्रसंग सांगायचं कारण म्हणजे केवळ टर्नओव्हर वाढला, म्हणजे कंपनी छान चालली असे नव्हे. तर कंपनीचे आर्थिक व्यवहार देखील तितक्याच नेटकेपणाने सांभाळणे गरजेचे असते. सहसा उद्योगाचा साईज हा त्याच्या सेल्स टर्न ओव्हर प्रमाणे सांगितला जातो. त्यामुळे अगदी महिना पन्नास लाखाचा सेल असेल असे जरी वाटले, तरी त्यातील ग्रॉस मार्जिन 30% पकडले, तरी पंधरा लाख उरतात. त्यातून सारे खर्च वजा जाता, गृहीत धरू पाच टक्के शिल्लक राहतात. जे तुमचे खरे तर स्वतःचे आहेत. या नफ्याची गुंतवणूक स्वतःच्या उद्योगांमध्ये करत राहता, तेव्हा उद्योगाचे भाग भांडवल वाढत राहते. कंपनीसाठी नवीन मशिनरी, जागा, इमारत, इत्यादी साठी लागणाऱ्या भाग भांडवलाचा महत्त्वाचा भाग यातून येत असतो. आणि त्यावरच तर बँक तुम्हाला कर्ज देखील देते, नाही का? परंतु लघुउद्योगाचा व्यवहार एकूणच असा सुरू असतो की, हे अडीच लाख हे फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये दिसतात. प्रत्यक्ष बँकेमध्ये तेवढी तेवढी रक्कम, दरमहा दिसेल असे काही नाही.


उद्योग मोठा होणे याचा सर्वसाधारण अर्थ सेल वाढणे. आणि सेल वाढवायचा असेल, तर कच्चामाल, मशिनरी, जागा, सारेच हवे. या गोष्टी नुसतेच बँकेकडून कर्ज घेऊन होत नसतात ना, त्यासाठी स्वतःचे बीज भांडवल देखील हवेच की. लघु उद्योजकाला ते सातत्याने तयार करत राहावे लागते.

मला वाटते, येथे आपण काही नेहमीच्या वापरातल्या शब्दांच्या व्याख्या जाणून घेऊ. म्हणजे या विषयावर अधिक प्रकाश पडेल.

{Gross Margin} = {Revenue} - {Cost of Goods Sold (COGS)}
थोडक्यात, तुम्ही एका फायनान्शिअल इयर मध्ये, जो नेट सेल केला (नेट सेल म्हणजे जीएसटी लावण्या पूर्वीची बिलाची निव्वळ रक्कम.) त्यातून तुम्ही विकलेल्या मालात वापरलेल्या कच्च्या मालाची किंमत वजा करून येते ते GM

Cost of Goods Sold {COGS} = {Beginning Inventory} + {Purchases} - {Ending Inventory}
अर्थात, आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला असलेले इन्व्हेंटरी, अधिक खरेदी, वजा क्लोजिंग इन्व्हेंटरी रुपयांमध्ये. म्हणजे

COGS. हा हिशोब तुम्ही महिन्याच्या महिन्याला देखील मांडू शकता. एक उदाहरण पाहू.

NET SALE = Rs.10,00,000/-
COGS = Rs. 725,000/-
GROSS MARGIN = 275,000/-

याचाच अर्थ, तुम्हाला विक्री करून जरी दहा लाख रुपये आलेले दिसले, तरी त्यातील फक्त 275000/- रुपये तुमचे आहेत. ज्यामधून तुम्हाला, लाईट बिल, रेंट, लोकांचे पगार, इतर खर्च, हे सारे भागवायचे आहे. आणि हो स्वतःचे घर खर्च चालवायला देखील घरी पैसे द्यायचे आहेत.

त्यातून जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त पर्चेस केलेले असेल, तर COGS वाढेल आणि अपसुकच ग्राॅस मार्जिन कमी होईल. तसेच जर का तुम्ही उधारीवर व्यवसाय करत असाल तर ग्रॉस मार्जिन ची रक्कम तुम्हाला तुमच्या खात्यात दिसण्याची शक्यता कमीच.

WORKING CAPITAL= CURRENT ASSETS-CURRENT LIABILITY

"वर्किंग कॅपिटल" म्हणजे "कार्यकारी भांडवल." हे एखाद्या व्यवसायाच्या दैनंदिन ऑपरेशन्ससाठी आवश्यक असलेल्या

उपलब्ध संपत्तीचे मोजमाप आहे.

यामध्ये चालू मालमत्ता (CURRENT ASSETS) म्हणजे रोख रक्कम, गोदामातील माल, खाती वसूल आणि इतर अल्पकालीन मालमत्ता. तर चालू दायित्वे (CURRENTLIABILITY) म्हणजे शॉर्ट-टर्म कर्जे, देणी, आणि इतर अल्पकालीन जबाबदाऱ्या. वर्किंग कॅपिटलचा सकारात्मक शिल्लक, म्हणजे व्यवसायाकडे आपल्या अल्पकालीन जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी पुरेशी तरलता आहे. तर नकारात्मक शिल्लक म्हणजे व्यवसायाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो आहे.

Bank CC account
सीसी किती आहे असे विचारल्यावर बरेचदा मला जे उत्तर आले आहे, ते चक्रावून टाकणारे आहे. सीसी मस्त 35 लाखाची आहे, पण ब्लॉक झाली आहे. त्याचं काय झालं मागच्या वर्षी फॉर्च्यूनर घेतली, त्याला वीस लाख कमी पडत होते, म्हणून सी सी तून उचलले. मोठे पेमेंट यायचं होतं. पण वेळेत आलं नाही. आता पैसे बँकेत भरले तर, ब्लॅक होल मध्ये गेल्यासारखी अवस्था. वापरायला मिळतच नाहीत.
मग अशावेळी बँक ओवरड्रा देते. तो घ्यायचा. तोही ब्लॉक होतो. आणि मग चालू राहते ती आर्थिक ओढाताण.

आता हे तुम्हाला ठाऊक नसते, असे अजिबात नाही. परंतु बरेचदा उद्योजक टेक्निकली साऊंड असतात, परंतु आर्थिक व्यवहारांमध्ये मात्र कमी पडतात. उद्योगाचा फायनान्शिअल साऊंडनेस मेंटेन करणे अतिशय गरजेचे असते. कारण त्यावर त्याच्या उद्योगाची पत अवलंबून असते. वेळेत पगार न देऊ शकणे, सप्लायर्सचे पेमेंट वेळेत देऊ न शकणे, यामुळे त्याची पत कमी होत असते. आणि सातत्याने त्याला काही ना काही खोटी उत्तरे देत बसावे लागते. असे करत बसण्याने मूळ उद्योगाकडे देखील लक्ष देणे अवघड होऊन बसते. आणि एकूणच अंतर्गत व्यवस्था कटकटीची बनून राहते.

मायक्रो आणि लघु उद्योगांमध्ये आधीच भांडवल कमी असते. त्यामुळे त्याचा वापर अधिक काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. यासाठी लघु उद्योजकाने या काही काळज्या घेणे अगदी आवश्यक,

.... भाग 4 समाप्त | 7 जुलै 24

Found this useful? Talk to us about your own factory plan.

Get In Touch