Article

लघुउद्योग 'लघु' च का राहतात ? [भाग 7]

1 min read • Oct 14, 2026

लघुउद्योग 'लघु' च का राहतात ? [भाग 7]
- मिनिष उमराणी (औद्योगिक सल्लागार)
भ्रमणध्वनी : 9822390363 | minish@leansigmasolutions.in

| चांगला माणूस हवा आहे |

बऱ्याच उद्योगांबरोबर काम करत असताना, खूप वेळा मला कोणी कोणी विचारतो की, तुमच्या माहितीत एखादा 'चांगला माणूस' असेल तर द्या. असे म्हणून ते स्वतःच हसतात. कारण चांगला माणूस ही एक अंधश्रद्धा आहे, असे मीच त्यांना यापूर्वी सांगितले आहे. त्यामुळे असे काही नसते, याची त्यांनाच खात्री असते. अर्थात त्याचे कारण देखील त्यांनी ठरवलेलं असतं. आपल्यासारख्या मागास गावामध्ये, हुशार विद्यार्थी टिकतच नाही. चांगले हुशार विद्यार्थी हे पुणे-मुंबई सारख्या शहरांमध्ये, मोठ्या मल्टिनॅशनल मध्ये, किंवा परदेशात किंवा आयटीमध्ये नोकरीला पळतात. आमच्यासारख्या छोट्या उद्योगांना कुठून चांगली माणसे मिळणार? मग आमच्या पदरी येतो तो गाळ.

एकुणात 'चांगला माणूस' म्हणजे नक्की काय? नक्की कसा माणूस आपल्याला कामासाठी चांगला किंवा योग्य वाटतो?

उच्चशिक्षित हवा? हुशार हवा, नक्की कसा? तुम्ही सांगाल ते ऐकणारा हवा की स्वतःच्या डोक्याने विचार करणारा हवा ? की नको? जर तो तुम्ही सांगितल्यावरच, आणि सांगितले तितकेच फक्त काम करत असेल, तर तो तुम्हाला सांगकाम्या वाटतो. स्वतःच्या डोक्याने एखाद्याने काही केले, आणि समजा चुकले, तर तुम्हाला ते चालत नाही. तेव्हा तुम्ही त्याला म्हणता, "मला विचारून का केले नाही?" बरोबर ना ?

मी असेही उद्योजक पाहिले आहेत, जे आपल्याच कर्मचाऱ्यांबद्दल बरे बोलत नाहीत. एक प्रतिष्ठित उद्योजक माझ्याशी बोलताना, मला म्हणाले होते की, आमचे कामगार म्हणजे अगदी X आहेत (त्यांचा शब्द वापरायचे मी टाळले आहे) मी त्यांना म्हणालो, जर तुम्हाला ठाऊक आहे कि ते X आहेत, तर ते घोड्यासारखा काम कसे करतील? तुम्ही चुकीची अपेक्षा करत आहात.

आपल्याच कर्मचाऱ्यांना, कामगारांना दोष देणे, म्हणजे आरशात पाहून स्वतःला दोष देण्यासारखे आहे. कारण या कर्मचाऱ्यांची निवड तुम्ही स्वतः केली आहे. त्या कर्मचाऱ्यांना कारखान्यात कसे वागायचे याचे प्रशिक्षण तुम्हीच तर दिले आहे. तुमच्याकडे पाहूनच तर तेही तयार झाले आहेत. तुमचे कर्मचारी हे तुमच्याच छोट्या-छोट्या प्रतिकृती आहेत हे विसरता कामा नये.


याउलट, कित्येक उद्योजक मला असेही भेटले आहेत की, ते त्यांच्या कामगारांशी नेहमीच आदराने वागतात, बोलतात. अर्थात त्यांची टीम देखील तशीच चांगली तयार होते. अगदी परवाच एका मसाल्याच्या उद्योजकांना भेटलो. त्यांनी अभिमानाने सांगितलं की, "आमच्याकडचा एकही कर्मचारी आजपर्यंत नोकरी सोडून गेला नाही. नवीन कर्मचारी पहिले सहा महिने टिकला, तर तो टिकलाच. तो सहसा सोडून जात नाही. मी नेहमीच, अगदी हेल्परशी देखील, आहो-जाहो भाषेतच बोलतो. आपण कामगारांचा आदर केला तर ते देखील चांगले काम करतात."

मला आठवते, 30-32 वर्षांपूर्वी मी एका छोट्या कारखान्यात कामाला होतो. तिथे एकदा कंपनीच्या मालकांना, अकाउंटंट संध्याकाळी उशीर पर्यंत काहीतरी काम करत बसलेला दिसला. त्यांनी त्याच्याजवळ जाऊन विचारले, "काय रे बाबा, आज का उशीर ?" त्याच्यावर तो म्हणाला, "दादा, पेटीकॅशचा हिशोब जुळवतो आहे मघापासून. काहीतरी चुकलंय. वीस (बापरे !) रुपयांचा हिशोब लागत नाहीये. यावरची त्यांची प्रतिक्रिया मी आजही विसरलो नाही. ते मोठ्याने हसले. त्याच्याजवळ बसले, आणि म्हणाले, "चल आपण सोडवूया तुझे गणित" आणि खरंच दोघे पुढे तासभर बसून वीस रुपयाचा हिशोब लावून

मग घरी गेले. कर्मचाऱ्याची चूक झाल्यावर मोकळेपणाने हसणारा, त्याच्याबरोबर बसून चूक सुधारणारा बॉस, मी पहिल्यांदाच पहात होतो.

उद्योजक स्वतः एकटाच उद्योग उभारू शकत नाही ना? त्याला कर्मचारी-कामगार यांची गरज तर लागतेच. त्यांची एक उत्तम टीम बनवणे, हे खरे तर त्याचेच काम आहे. गाव करील ते राव काय करील ? असे म्हटलेच आहे. आपल्याकडे, अगदी महाराष्ट्रातच, उत्तम टीम कशी असावी, याचे अतिशय मोठे उदाहरण आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा एक एक मावळा हा, त्यांच्यासाठी प्राण द्यायला देखील तयार होता. "आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे" असे म्हणणारा तानाजी. महाराज गडावर पोहोचेपर्यंत प्राणाची ही पर्वा न करता, खिंडीत लढत राहिलेला बाजीप्रभू. अशी उदाहरणे आपल्याच इतिहासातील आहेत.

आजच्या काळामध्ये कुणासाठी प्राण देण्याची, किंवा प्राण घेण्याची गरज नाही. परंतु उत्तम काम करणारी, समजून-उमजून काम करणारी, एकाच ध्येयाने प्रेरित झालेली, अशी टीम मात्र उद्योजकाने बनवायला हवी. समर्थ रामदासांनी, संभाजी राजांना लिहिलेल्या पत्रामध्ये, शिवरायांचे त्यांच्या मावळ्यांबरोबर असलेल्या संबंधांविषयी, अतिशय सुंदर लिहिले आहे,


॥ शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे ॥

यातला 'सलगी देणे' हा शब्द अतिशय महत्त्वाचा. कोणत्याही कामगाराला, त्याला मिळणाऱ्या पगारापेक्षाही, अधिक महत्त्वाची गोष्ट जी वाटते, ती म्हणजे, मालकाकडून त्याला मिळणारा आदर, आपलेपणा. अर्थात हा आदर किंवा आपलेपणा देखील, तुमच्याकडून अतिशय सहजतेने कामगाराकडे-कर्मचाऱ्याकडे, आपोआप फ्लो व्हायला हवा. त्यात सच्चेपणा हवा. त्याला तुमच्या वागण्यातली उब जाणवायला हवी. अन्यथा तुमचा आदर हा खोटा वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग, काम असले की मालक गोड बोलतो. इतर वेळी आमच्याकडे बघत सुद्धा नाही. अशी भावना कामगारांची होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जसे तुम्हाला तुमचा उद्योग मोठा करावा असे वाटते, तसेच तुमच्या कर्मचाऱ्याला देखील स्वतः मोठे व्हावे असे वाटत असणारच ना? आणि त्याचे मोठे होणे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते. आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याची वैयक्तिक प्रगती देखील साधता यायला हवी, तरच तो आपल्या कामामध्ये आनंदी राहील व टिकून

राहण्याची शक्यता वाढेल. आपल्या उद्योगाची वाढ करण्यामध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असतो. त्यामुळेच आपली टीम मजबूत आणि एकाच ध्येयाने प्रेरित बनवणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.

'चांगल्या' माणसाचा शोध कुठे बाहेर घेण्याची गरज नाही. तुमच्याकडे असलेला प्रत्येक कर्मचारी, हा नक्कीच 'चांगला' आहे, यावर स्वतः विश्वास ठेवायला हवा. आणि त्यांनाच विश्वासात घेऊन, आपली टीम उत्तम बनवायला हवी. आणि हे सर्वस्वी तुमच्या लीडरशिप स्किल वर अवलंबून आहे.

.... भाग 7 समाप्त | 28 जुलै 24

Found this useful? Talk to us about your own factory plan.

Get In Touch