Article

लघुउद्योग 'लघु' च का राहतात ? [भाग 8]

1 min read • Oct 14, 2026

लघुउद्योग 'लघु' च का राहतात ? [भाग 8]
- मिनिष उमराणी (औद्योगिक सल्लागार)
भ्रमणध्वनी : 9822390363 | minish@leansigmasolutions.in

| कान्तार्धं मम जीवनं सहचरीं |

माझ्या बऱ्याचशा मराठी क्लायंट्सच्या उद्योगांमध्ये, मी पाहिले आहे, त्यांची पत्नी त्यांच्याबरोबर असते. पत्नी त्यांच्याबरोबर ऑफिसला येते, आणि ती एचआर किंवा अकाउंट्स पाहते असे सांगण्यात येते. परंतु ती फारसे काही पाहत नसते. तर काही ठिकाणी असेही पाहायला मिळाले की, ती उद्योगातील एखादा विभाग स्वतंत्रपणे हँडल करते. आणि पतीची उत्तम सहकारी असते.

तर काही ठिकाणी असेही अनुभवास आले आहे की, साधारण वीस-पंचवीस कोटी टर्नओव्हर करणाऱ्या उद्योजकाची पत्नी मात्र, त्या उद्योगात बिलकुलच रस दाखवत नाही. तर ती इतरत्र, सोशल क्लब, भिशी, मैत्रिणी किंवा कुटुंब याच्यामध्ये रममाण झालेली असते. अर्थात हा जिच्या-त्याच्या आवडीचा विषय असू शकतो.

मला आठवते, एका सरबत उद्योगाबरोबर काम करत

असताना, मी त्यांच्या पत्नीला विचारले की, तुम्ही तुमच्या उद्योगांमध्ये नक्की काय काम करता ? त्यावेळी त्यांनी सांगितले की, तसे काही नाही, माझा नवरा सांगेल त्या कामांमध्ये मी त्याला मदत करते. पण मी रोज मला वेळ मिळेल तसे कारखान्यामध्ये जाते. त्यांनी हे देखील बोलून दाखवले की, त्यांना एखादा विभाग स्वतंत्रपणे हँडल करायचा आहे. अशा वेळेस मी त्या उद्योजकाला सांगितले की, तुम्ही त्यांच्याकडे एखादा स्वतंत्र विभाग द्या. आणि त्यांना महिना पगार देखील चालू करा. त्यांनी हो-नाही करत महिन्याला पंधरा हजार रुपये पगार देण्याचे कबूल केले. आणि त्यांनी त्यांचे एक फॅक्टरी आउटलेट स्वतंत्रपणे पाहायला सुरुवात केली. त्यांचा धडाका एवढा जबरदस्त होता की, त्यांनी पुढील दोन-चार वर्षांमध्ये फॅक्टरी आउटलेट्स वाढवली. आणि आता जवळपास दहा ते बारा फॅक्टरी आउटलेटस् त्या, स्वतंत्रपणे पाहतात. त्यामध्ये त्यांच्या पतीला फारसे लक्ष घालावे लागत नाही. नंतरच्या एका विजीटमध्ये त्यांनी मला जी माहिती दिली, त्यामुळे पत्नीचा सहभाग, हा एखाद्याच्या उद्योगांमध्ये किती उपयुक्त ठरू शकतो, याचे खूप छान उदाहरण मला पाहायला मिळाले. त्यांचे प्रोडक्ट्स हे फळांपासून बनतात. त्यात स्पर्धा असल्यामुळे, कच्चामाल मिळण्यामध्ये खूप सार्‍या अडचणी येत असत. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा स्पर्धा नव्हती, तेव्हा बरेच सारे लोक त्यांच्याकडची फळे, उदाहरणार्थ कोकम, करवंद, आवळे, इत्यादी त्यांच्या कारखान्यांमध्ये येऊन

स्वतःच देत असत. परंतु स्पर्धा सुरू झाली तसे हे लोक पांगू लागले. आणि एक दोन रुपयाच्या रेटच्या फरकाने इतरांना देखील माल देऊ लागले. त्यांना जेव्हा मी सुचवले की, आता आपल्याला कच्चामाल पुरवणाऱ्या लोकांना एकत्रित करायला हवे. त्यांचा डेटा गोळा करायला हवा. आणि त्यांच्या घरापर्यंत पोहोचायला हवे. तेव्हा त्यांनी आसपासचा एक दोन जिल्ह्यांचा परिसर अक्षरशः चाळून काढला. घरोघरी फिरून त्यांनी तेथील लोकांचे फोन नंबर, पत्ते मिळवले. आणि आता कच्चामाल मिळवण्या साठी स्वतःची गाडी पाठवून, त्या कच्चामाल कलेक्ट करू लागल्या. याचा त्यांना फारच मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. आणि कच्च्या मालाची अडचण नाहीशी झाली.

"कान्तार्धं मम जीवनं सहचरीं सौम्यं सुवर्त्मागमं,
सर्वत्रापि सहायकां विदधतीं मित्रं च कान्तां शुभाम्।
सामर्थ्यं धृतिमान्विता सुखमयीं धर्मे स्थितां सुभ्रुवां,
तां पत्नीं सज्जनः सतां गृहरतिं धर्मे च विद्या च या।"

असा एक संस्कृत श्लोक आहे त्याचा अर्थ,
"पत्नी जीवनात एक सहचरी, मित्र, सुखमयी, धैर्यशाली, आणि धर्माचरण करणारी आहे. ती आपल्या सर्व गुणांनी पतीसाठी सर्वोत्तम सहकारी आहे."

पत्नी इतका विश्वासू, निरपेक्ष आणि, 24 तास 12 महिने उपलब्ध असणारा दुसरा सहकारी नाही. परंतु बरेच ठिकाणी असे देखील दिसते की, तिला केवळ गृहीत धरले जाते. व्यवसायात तिचे स्वतंत्र अस्तित्व, निर्माण न होता, केवळ सांगकाम्या म्हणून तिचा वापर होत असतो. तिला स्वतंत्रपणे पगार देखील दिला जात नाही. तर केवळ इन्कम टॅक्सची अड्जस्टमेंट म्हणून कागदोपत्री पगार दाखवला जातो.

असे न होवो, परंतु अचानक एखाद्या उद्योजकाचे काम करणे, काही कारणाने बंद झाले तर ? तो उद्योग सांभाळणार कोण ? मी असेही उद्योग पाहिजे आहेत की, एक उद्योजक अचानक गेल्यानंतर, त्याच्या पत्नीने तो उद्योग विकून टाकला किंवा दुसऱ्या कोणाला चालवायला दिला. आणि अगदी विरुद्ध उदाहरण देखील पाहिले आहे. एका फॅब्रिकेशन उद्योगात काम करणाऱ्या उद्योजकाच्या पत्नीने, तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, कारखाना स्वतंत्रपणे सांभाळला, आपल्या मुलांना मोठे केले. एवढेच नव्हे, तर उद्योजकतेचे पारितोषिक देखील मिळवले.

मला वाटते, लघु उद्योगाच्या बाबतीत, आपल्या उद्योगामध्ये आपली पत्नी सहकारी म्हणून असणे ही अतिशय चांगली बाब आहे. आपल्याबरोबर आपल्या उद्योगात, आपल्या पत्नीचा वाटा, तिला मिळणारे ट्रीटमेंट, ही पार्टनर सारखी

असायला हवी. तिला आपल्या व्यवसायाचे उद्दिष्ट आणी त्यातील साऱ्या खाचा खोचा ठाऊक असायला हव्यात. माझे एक मित्र होते. ते नेहमी सांगायचे, "ट्रीट युवर वाइफ लाईक युवर विडो" तुमच्या गैरहजेरीत किंवा तुमच्या नंतर देखील, तिने व्यवसाय स्वतंत्रपणे आणि सहजतेने सांभाळला पाहिजे, याची व्यवस्था तुम्हाला तुमच्या हयातीतच करायला हवी.

अर्थात यासाठी पत्नीची देखील मानसिकता तशी असायला हवी. आणि अर्थात, तिला तुमच्या उद्योगात इंटरेस्ट वाटावा, तो अभिमानास्पद वाटावा, अशी तुमच्या उद्योगाची अवस्था असणे, हे तुमचे स्वतःचे काम आहे. तुमचा कारखाना, अजागळ, पसरलेला, अस्वच्छ, असेल, कामगारांचा कलकलाट, भांडणे, चालू असतील तर, पत्नी सोडा, कर्मचाऱ्याला देखील तेथे काम करायची इच्छा होत नाही. आपल्या पतीला दिवसभर, मालाच्या डिलिव्हरी साठी, पैशासाठी फोन येत आहेत, ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत, त्यावर आपल्या पतीला सतत खोटे बोलावे लागत आहे, काहीतरी उत्तरे देऊन टाळाटाळ करावी लागत आहे, हे कुठल्या पत्नीला आवडेल?

यासाठी तुमचा उद्योग, तुमचा कारखाना, नेहमीच नीटनेटका स्वच्छ हवा. कामासाठी उत्सुकता वाटेल असे वातावरण

तुम्ही तेथे निर्माण करायला हवे. उद्योगाचे आर्थिक व्यवहार पारदर्शक असायला हवेत. कामगारांशी, पुरवठादारांशी, ग्राहकांशी असलेले संबंध देखील उत्तम राखायला हवेत. आपल्या उद्योगात आणि उद्योगामुळे बाहेर देखील आपल्या पतीला मान मिळतो, हे अर्थातच कोणाही पत्नीला आवडणारीच गोष्ट आहे, नाही का?

अशा कारखान्यात, तेथील कामात, सहभागी व्हायला पत्नीला देखील उत्सुकता वाटेल. अति लघु आणि लघु उद्योगांमध्ये, प्रामुख्याने उद्योजकाला हवी असते ती, मनापासून, निरपेक्ष, आणि विश्वासू साथ. पत्नीशिवाय असा सहकारी कोण असू शकतो ? आणि तिचे सहकार्य मिळाले तर, लक्ष्मीचेच सहकार्य मिळाल्यासारखे आहे.

.... भाग 8 समाप्त | 4 ऑगस्ट 24

Found this useful? Talk to us about your own factory plan.

Get In Touch