Article

लघुउद्योग 'लघु' च का राहतात ? [भाग 5]

1 min read • Oct 14, 2026

लघुउद्योग 'लघु' च का राहतात ? [भाग 5]
- मिनिष उमराणी (औद्योगिक सल्लागार)
भ्रमणध्वनी : 9822390363 | minish@leansigmasolutions.in


| TOP2BOTTOM |

उद्योगाची टॉपलाइन महत्वाची की बाॅटमलाइन ? हा प्रश्न मला बरेचदा विचारला जातो. आपण आधी टॉपलाईन आणि बॉटम लाईन म्हणजे नक्की काय ते पाहू,

टॉप लाईन म्हणजे कंपनीचे एकूण उत्पन्न किंवा विक्री (अर्थात जीएसटी पूर्वीचे). हे 'टॉप लाईन' म्हणून ओळखले जाते कारण हे इनकम स्टेटमेंटच्या पहिल्या ओळीत असते. कोणत्याही व्यावसायिक खर्चाच्या आधीचे हे उत्पन्न आहे.

बॉटम लाईन म्हणजे कंपनीचा निव्वळ नफा. हा 'बॉटम लाईन' म्हणून ओळखला जातो, कारण तो इनकम स्टेटमेंटच्या शेवटच्या ओळीत असतो. ही एकूण उत्पन्नातून सर्व खर्च, कर आणि व्याज वगळल्यानंतर उरलेली रक्कम असते.

एक उदाहरण बघू. समजा तुमच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर हा 3 कोटी रुपये आहे. म्हणजे तुमचे एकूण उत्पन्न अर्थात टॉपलाईन 3 कोटीची आहे. वर्षभरातील कर्मचाऱ्यांचे पगार, टॅक्स, वेगवेगळी बिले, व्याज, इत्यादी सारे काही वजा करून 15,00,000 रुपये शिल्लक राहिले. ती झाली तुमची बॉटम लाईन, म्हणजेच निव्वळ नफा. टॉप लाईनशी बॉटम लाईनचे गुणोत्तर काढले असता 5% एवढे येईल.

आता आपण टॉपलाईन न वाढता, बॉटम लाईन वाढवता येईल का ? याचा विचार करू. बॉटम लाईन वाढायची असेल, तर निव्वळ नफ्याचे परसेंटेज 5% वरून, 6%, 8%, 10% असे काहीतरी व्हायला हवे. याचाच अर्थ निव्वळ विक्री मधून होणारी वजावट, आपल्याला कंट्रोल करता यायला हवी. आता, सरकारी कर, कर्मचाऱ्यांचे पगार, बँकेचे व्याज, कच्च्या मालाची किंमत, यातील कुठला खर्च आपण, किती प्रमाणात कमी करू शकू, असे तुम्हाला वाटते ? तुमचा कारखाना चालवण्यासाठी तुम्ही कर्ज घेतले नसेल, तर तुम्ही बँकेचे व्याज नक्कीच वाचवू शकता. परंतु त्यासाठी तुमचे भाग भांडवल, आणि होल्डिंग कपॅसिटी तेवढी हवी. ती नसेल तर, मासिक पंचवीस लाख रुपयांचा सेल करण्यासाठी, तुमच्याकडे किमान 15 लाख रुपये तरी सीसी हवे. त्यावरचे व्याज, दहा टक्क्याने हिशोब केला असता, वार्षिक दीड लाख रुपये एवढे झाले. ते तुम्ही वाचवू

शकलात, तर तुमचे बॉटम लाईनचे परसेंटेज होईल साडेपाच टक्के. म्हणजे फक्त अर्ध्या टक्क्याने वाढू शकेल. परंतु इतर खर्च मात्र वाचवण्यासारखे नाहीत.

तुमच्या उत्पादनाची विक्रीची किंमत, आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत, या दोन्ही तुमच्या हातात नसतात. विकलेल्या मालाच्या रकमेची वसुली वेळेत झाली नाही, किंवा बेहिशोबीपणाने चुकून जरी इन्व्हेंटरी वाढली, तर तुमची बॉटम लाईन लगेचच डिस्टर्ब होऊ शकते. एकूणच काय तर टॉप लाईन न वाढता बॉटम लाईन फारशी वाढण्याची शक्यता नसते.

लघुउद्योगामध्ये खर्चाची कपात करत राहणे, हे जसे गरजेचे आहे, तसेच सातत्याने टॉपलाईन वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहणे देखील आवश्यकच. एक थम्ब रुल म्हणून ध्यानात ठेवा की, टॉपलाईन एवढी असायला हवी की, बॉटम लाईन थोडीफार वर खाली झाली तरी, कुठल्याही महिन्यामध्ये आपल्याला नेहमीच्या खर्चांना अजिबात अडचण येता कामा नये. कर्मचाऱ्यांचे पगार सप्लायरची पेमेंट कर्जे आणि बिले ही वेळेत जायला हवीत.

टॉपलाईन वाढवायची असेल तर अर्थातच उद्योजकाचा फोकस हा टॉपलाईनवर असायला हवा. त्यासाठी आपल्या

उत्पादनाचे व्यवस्थित मार्केटिंग करणे, त्यासाठी गरजेप्रमाणे जाहिरात करणे, या सगळ्या गोष्टींचा अवलंब करणे देखील आवश्यक आहे. साधारणपणे प्रत्येक तिमाहीला टार्गेट ठरवून, ते टार्गेट अचीव करण्यासाठी एफर्टस् घ्यायला हवेत. आणि यासाठी तुम्हाला स्वतःला वेळ मिळायला हवा. तुम्ही जर रोजच्या फायर फायटिंग मध्ये अडकलेला असाल, तर हे शक्य होत नाही. काही उद्योग तर मी असे पाहिले आहेत की, या महिन्यात ऑर्डर नाही आल्या तर बरे होईल, हातातल्या ऑर्डर कशाबशा संपवता येतील, असा देखील विचार करतात.

दरवर्षी किमान 25 टक्के वाढ, हे झाले सर्वसाधारण उद्दिष्ट. दरवर्षी किमान 50 टक्के वाढ हे झाले ध्येय. आणि अशा ध्येयाने प्रेरित होऊन सातत्याने प्रयत्न करणारा लघुउद्योग, मोठा झाल्याशिवाय राहणार नाही.

.... भाग 5 समाप्त | 14 जुलै 24

Found this useful? Talk to us about your own factory plan.

Get In Touch